पावसाळी फ्रेम्स

गेले २-३ दिवस इथे पाऊस पडत होता . इथली नेहमीची उन्हाळी हवा दूर कुठेतरी पळून जावी अशी गायब झाली. तसा पाऊस नेहमीच आवडीचा विषय राहिला आहे. पण मध्यंतरी जरा दुर्लक्षलेला . पण कालच्या पावसाळी गार हवेने बऱ्याच दिवसांनी पाऊस परत आवडला.

 मला पाऊस आवडतो . कधी पाहायला, कधी भिजायला तर कधी नुसताच आठवायला.  कधी कल्पनेतला पाऊसही आवडतो . आपल्याचं विश्वात फुलवायला .
पाऊस खूप खूप बरसून आणि चिंब भिजवूनही उरला की खरा पाऊस वाटतो . एखादा निवांत दिवस असावा . कोणत्याही अपेक्षा नसलेला . मग आजूबाजूच्या वातावरणाची किंवा कशाचीही चिंता न करता चिंब भिजत राहावं इतकं की पाऊस मनापर्यंत झिरपतोय असं वाटावं . अशा वेळी पाऊस समजतो आणि भिजवतोही , खऱ्या अर्थाने ..

काल पाऊस पाहता पाहता उगीच आठवत होते की मुद्दाम पावसात भिजून किती वर्ष झाली . नक्की आठवलं नाही पण पावसात भिजलेल्या आठवणी मात्र जाग्या झाल्या .आपण पाऊस आठवतो , तेंव्हा खर तर पावसाळी आठवणींच्या फ्रेम्स आठवतो. 
माझ्या आवडत्या पावसाळी फ्रेम्सपैकी एक म्हणजे माझ्या हॉस्टेलच्या रूम मधून दिसणारा पाऊस .. युनिवर्सिटी च्या कॅम्पस मधली हिरवीगार झाडी अजूनच सुंदर वाटत असे पावसात . पाऊस पडून गेल्यावर रस्ता स्वच्छ आणि नितळ दिसे . स्वत:चेच विचार स्वत:ला अधिक स्पष्टपणे जाणवत आहेत असे वाटे .
 किती गंमत असते ,एखादा क्षण आपण जेंव्हा जगत असतो तेव्हा माहितीच नसत की तो इतका आठवला जाईल . आणि अशी जर जाणीव झाली की हाच तो क्षण , जो आपल्याला आठवेल तर आपण तो थोपवण्याचा किंवा बंदिस्त करायचा प्रयत्न करतो. कॉलेज संपण्याच्या शेवटच्या काही दिवसात हे प्रकर्षाने जाणवत .. जिकडेतिकडे फोटोंचे लखलखाट दिसतात . माझेही कॉलेजचे शेवटचे दिवस याला अपवाद नव्हते पण काही केल्या खिडकीतून दिसणारा पाऊस काही एका क्लिक मध्ये पकडता येईना . मग शेवटी फोटो चा नाद सोडला आणि शांतपणे पाऊस थांबेपर्यंत तो पाहत राहिले

0 comments:

 
Blogger Templates